मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.कळवा येथील पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला मात्र त्यावेळी या प्रकाराची इतकी वाच्यता झाली नाही.संबंधित महिलेने त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीनंतर वेगाने चक्र फिरली आणि माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय स्पष्टीकरण देणार हे पाहावे लागेल.तर विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे.जे माझ्यासोबत झाले आहे ते दुसऱ्या महिलेसोबत होऊ नये.हे काय आहे मध्ये येता म्हणून बाजूला उचलून फेकून देता.जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडे वाट मागायला पाहिजे होती किंवा दुसऱ्या वाटेने जायला हवे होते.पण आपल्या हातात ताकद आहे त्याचा वापर करू ही जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे त्यांनी माझ्यासोबत केले ते खूप चुकीचे आहे.मी या प्रकाराचा निषेध करते असे संबंधित महिलेने सांगितले आहे.
मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले.मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित संंबंधित महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि महिला हे आमने-सामने आले आले यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे,चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.दोन आठवड्यापूर्वी दिवा आणि मुंब्र्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील तलावाजवळ छटपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संबंधित महिलेने भाजपतर्फे शुभेच्छा आणि स्वागताचे बॅनर लावले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी देखील बॅनर लावले.बॅनर लावण्यावरून संबंधित महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता तेव्हा देखील आपल्याला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिवीगाळ करत हल्ला केल्याची तक्रार संबधित महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यामुळे आव्हाड यांनी जाणुनबुजून माझा अपमान करण्यासाठी माझ्याशी अशाप्रकारे वर्तन केल्याचे संबधित महिलेने म्हटले आहे.