मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची वाट धरली.त्यानंतर कीर्तिकरांकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याची उत्सुकता होती अखेर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली होती ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही होते. कीर्तिकरांच्या गच्छंतीनंतर शिवसेना नेतेपद आणि लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी सहा नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे बोलले जात होते.
अनिल देसाई यांचे नाव सुरुवातीपासूनच लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर मानले जात होते त्यांच्याकडे आधी स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीसपद होते.अनेक वर्षांपासून ते स्थानिय लोकाधिकार समितीत काम करत आलेत.याशिवाय ते ठाकरे कुटुंबाच्या मर्जीतीलही आहेत त्यामुळे हे पद त्यांच्याकडे जाणार अशी अटकळ सुरुवातीपासूनच बांधली जात होती त्यानुसार ठाकरेंनी त्यांची निवड केली.दुसरीकडे अनिल देसाई सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.सचिव पदावरुन नेतेपदावर बढती व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले.आता स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदासोबत शिवसेना नेतेपदही त्यांना मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.