गुजरात-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह प्रादेशिक पक्ष तयारीला लागले आहेत.भाजप,काँग्रेस आणि आप यांच्यात प्रमुख लढत आहे.प्रादेशिक पक्ष भारतीय ट्रायबल पक्ष देखील गुजरातमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.राज्यातील आदिवासी बहूल भागात या पक्षाची मते निर्णायक आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत बीटीपीने काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती.यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेते छोटूभाई वसावा आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.महेश वसावा यांनी नर्मदा जिल्ह्यातील झगडिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.नुकताच छोटूभाई वसावा यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे सत्तासंघर्षात गुजरातमध्ये पिता-पुत्र आमने सामने आल्याचे दिसून आले आहे.भारतीय ट्रायबल पार्टीचे संस्थापक आणि आमदार छोटूभाई वसावा यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झगडिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.तर छोटूभाई वसावा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे ट्विटरवरुन जाहीर केले होते.
बीटीपीचे पक्षप्रमुख महेश वसावा यांनी नर्मदा जिल्ह्यातील आरक्षित झगडिया मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करताना वडील छोटूभाई वसावा यांची उमेदवारी कापली आहे.
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मतदान पार पडणार आहे.२०१७ मध्ये महेश वसावा नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा मतदारसंघातून विजयी झाले होते.महेश वसावा यांनी यावेळी झगडिया मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर डेडियापाडा मतदारसंघात बहादूरसिंह वसावा यांना उमेदवारी दिली आहे.बीटीपीचे संस्थापक छोटूभाई वसावा हे सातवेळा आमदार राहिले आहेत.२०१२ पर्यंत त्यांनी जनता दल यूनायटेडकडून निवडणुकीत विजय मिळवला होता.२०१७ मध्ये बीटीपीचे दोन उमेदवार विजयी झाले होते त्यामध्ये ते स्वत: आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांचा समावेश होता मात्र त्यावेळी त्यांची आणि काँग्रेसची आघाडी होती.बीटीपीने यावेळी आदिवासी बहूल क्षेत्रातील मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी २७ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.