शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातील शेगाव मध्ये आहे.काल ( १८नोव्हेंबर)शेगावात राहुल गांधींची सभा पार पडली.या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.मुलांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारकडे पैसे नाहीत पण पंतप्रधानांना विमान घेण्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपये आहेत अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे.
महाराष्ट्राची भूमी संत,सामाजिक सुधारकर्ते आणि देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या क्रांतिकारकांची आहे असे म्हणत कन्हैया कुमार म्हणाले की, देशात आपण टॅक्स भरतो त्याबदल्यात सरकार आपल्याला अन्न,पाणी,वस्त्र,निवारा देईल अशी अपेक्षा असते मात्र काही वर्षापासून सर्वसामान्य लोकांच्या भावनांना समजून घेतले जात नाही.टॅक्स आपल्याकडून वसूल करण्यात येतो पण कर्जमाफी पंतप्रधानांच्या मित्रांना दिली जाते. आपण पंतप्रधानांचे मित्र असतो तर कर्ज घेऊन आपल्याला चॅर्टर विमानाने पळून जाता आले असते असा टोलाही कन्हैया कुमार यांनी लगावला आहे.पंतप्रधान सभांमध्ये बोलताना सांगतात मी गरिबांचा मुलगा आहे.तुम्ही गरीब असता तर देशातील शाळा का बंद केल्या जात आहेत.सरकारी नोकर भरती का केली जात नाही कारण यांना देशातील मुलांना शिक्षण आणि रोजगार द्यायचा नाही.देशात सुरु असलेल्या लुटीविरुद्ध आपण एकत्र आले पाहिजे.यांच्या विरोधात बोलले तर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे राहुल गांधी चोराला चोर तोंडावर बोलतात.चोराला तोंडावर चोर बोलल्यावर एक कट रचला जातो.त्या कटाविरोधात आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहनही कन्हैया कुमार यांनी केले आहे.