उत्तर प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून तिच्या शरिराचे सहा तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेतील आरोपी प्रिन्स यादवला पोलिसांनी अटक केली आहे.पीडित महिलेचा खून करून तिचे अवयव विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार घटनास्थळी शोधकार्य राबवण्यासाठी जाताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपीला गोळी लागली आहे.या आरोपीला शनिवारी पोलिसांनी अटक केली होती.गावठी पिस्तुलाच्या साहाय्याने आरोपीने पोलिसांच्या तावडीतून फरार होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
१५ नोव्हेंबरला आजमगढमधीस पश्चिमी गावात २० वर्षीय आराधनाचा मृतदेह स्थानिकांना विहिरीत सापडल्यानंतर ही खूनाची घटना समोर आली.पीडितेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला असून ही घटना दोन ते तीन दिवस आधी घडल्याची माहिती आजमगढचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी दिली आहे.आरोपीने त्याचे आई-वडिल,भाऊ सर्वेश आणि इतर कुटुंबियांच्या मदतीने पीडितेच्या खूनाचा कट रचला होता.पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून आरोपी प्रिन्सने तिचा खून केला.पीडित तरुणी आजमगढ जिल्ह्यातील इशाकपूर गावातील रहिवासी होती.९ नोव्हेंबरला आरोपी प्रिन्सने पीडितेला मंदिरात नेले.मंदिरालगत ऊसाच्या शेतात भाऊ सर्वेशच्या मदतीने आरोपीने पीडितेचा गळा आवळून खून केला.त्यानंतर या दोघांनी तिच्या शरिराचे सहा तुकडे केले.हे तुकडे प्लास्टिक बॅगमध्ये भरुन आरोपींनी विहिरीत फेकले.पीडितेचे मुंडके जवळच असलेल्या एका तलावात फेकले.दरम्यान या खून प्रकरणात आत्तापर्यंत एक धारदार शस्त्र,एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.या गुन्ह्यातील अन्य आरोपी सर्वेश,प्रमिला यादव,सुमन,राजाराम,कलावती,मंजू आणि शिला अजुनही मोकाट आहेत.