उत्तरप्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना एक्स्प्रेस-वेवर ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मृतदेहाचे गू़ढ अखेर उकलले आहे.पोलिसांना बॅगेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता.यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता तपासादरम्यान तरुणीच्या वडिलांनीच मुलीचा गोळी झाडून खून केल्याचे समोर आले आहे.खून केल्यानंतर त्यांनी मृतदेह बॅगेत भरुन फेकून दिला होता.आयुषी यादव असे या तरुणीचे नाव आहे. दिल्लीमधील बदरपूर येथील ती रहिवाशी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आयुषी आपल्या वडिलांना काही न सांगताच घराबाहेर गेली होती.यामुळे वडील नितेश यादव संतापले होते. आयुषी घरी येताच त्यांनी गोळी घालून तिचा खून केला.यानंतर त्यांनी प्लास्टिकमध्ये तिचा मृतदेह गुंडाळला आणि एका बॅगेत भरला.उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांनी हा मृतदेह फेकून दिला होता.शुक्रवारी पोलिसांना हा मृतदेह सापडला होता.पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान होते.पोलिसांनी जवळच्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना घटनेची माहिती दिली होती.दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.