यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील तरुण गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्षे) हा शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २२ पासून बेपत्ता होता.सदरील तरुणाची त्यांच्या नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु याबाबत कुठलीही माहिती मिळाली नव्हती,मात्र आज दि.२२ मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या गावठाण विहिरीवर सदरील तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला.तब्बल ४ दिवसानंतर सदरील तरुणाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर अत्यंत कुजलेल्या व छिन्नविछिन्न परिस्थितीत आढळून आला.याबाबत पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसात माहिती दिल्यावरून पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आपल्या फौजफाट्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करून परिस्थितीची पाहणी केली.मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी तरुण गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्षे) हा येथील जय भवानी कोल्ड्रिंक या दुकानावर कामावर होता.सदरील युवक रोज आपले नेहमीप्रमाणे काम आटपून घरी निघून जात असे.मात्र १८ नोव्हेंबर २२ रोजी हा युवक घरी न जाता दुकानावरच रात्रीपर्यंत थांबला असावा.कारण त्याच्या मोबाईलवरून तो त्या रात्री २.५५ पर्यंत ऑनलाईन असल्याचे आढळून आलेले आहे.त्यानंतर गावकऱ्यांनी या युवकाचा त्यांच्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता या युवकाचा कुठेही थांगपत्ता मिळू शकला नव्हता मात्र येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गावठाण विहिरीवर एका कोपऱ्यात दुकानाच्या चाव्या आढळून आलेल्या होत्या.सदरील युवकाने या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या तर केली नाही ना? या संशयातून ग्रामस्थांनी दोनवेळा पोहणाऱ्या व्यक्तींकडून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेव्हाही काही माहिती मिळू शकली नव्हती.परंतु आज दि.२२ मंगळवार रोजी ग्रामपंचायतीच्या गावठाण विहरीत पाण्यावर प्रेत तरंगतांना ग्रामस्थांच्या लक्षात आले.सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी पुढील सोपस्कार व्यवस्थित सांभाळून पूर्ण केले.याकामी त्यांना सरपंच नवाज तडवी यांचे सहकार्य लाभले.परिणामी या युवकाने आत्महत्या केली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकायला मिळत आहे.सदरील युवकाने आत्महत्या का केली?याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.पुढील तपास यावल पोलिस करीत आहेत.
सदरील गणेश दिलीप ढाके या तरुणाच्या पश्चात आई,मुलगी,मुलगा व पत्नी असा परिवार आहे.सदर युवकाच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.