मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे.या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल?याची सगळेजण वाट पाहत आहेत.हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे.हा विस्तार झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल असेदेखील आशिष जैस्वाल म्हणाले आहेत त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचेही मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागून राहिले आहे.कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार?शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार?अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती तसेच काही शिवसेना नेत्यांनी २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार!असा दावा देखील केला होता.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.येत्या १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे आशिष जैस्वाल यांनी म्हटले आहे.