Just another WordPress site

‘एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अहमदनगर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख,मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असे वक्तव्य केले आहे.त्यानंतर राज्यात सीमाभागातील गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महाविकासआघाडीच्या नेत्यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.यात त्यांनी हि मागणी २०१२ ची असल्याचे मत व्यक्त केले आहे.ते बुधवारी दि.२३ नोव्हेंबर २२ रोजी अहमदनगरमधील शिर्डी येथे आले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.एकनाथ शिंदे म्हणाले की,ही मागणी २०१२ ची होती त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती त्यानंतर आपण तेथे बऱ्याच योजना केल्या आहेत.जलउपसा सिंचन,जलसिंचन प्रकल्प अशा अनेक गोष्टी आम्ही मार्गी लावत आहोत.पाण्यामुळे एकही गाव कर्नाटकमध्ये जाण्याचा विचार करणार नाही.एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे.त्या भागातील जे प्रश्न,समस्या आहेत त्यापैकी काही सोडवले आहेत तर काही बाकी आहेत.उरलेले प्रश्न युद्धपातळीवर सोडवले जातील.कोणावरही अशी वेळ येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,याबाबत आमची काल-परवाच एक बैठक झाली.हा जुना वाद न्यायालयात प्रलंबित आहे.सर्वोच्च न्यायालयात याविषयी लढाई सुरू आहे परंतु त्याशिवाय हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे तशीच राज्य सरकारची भूमिका आहे.दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्याही बैठका झाल्या आहेत.यात केंद्र सरकारही सकारात्मक भूमिका घेईल.सीमा भागातील मराठी माणसांना योजना राबवून काही लाभ देण्यात आला.त्यात आम्ही आणखी वाढ केली आहे.स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे निवृत्तीवेतन १० हजारांवरून २० हजार रुपये केले.बंद झालेला मुख्यमंत्री धर्मादाय सहाय्यता निधी पुन्हा सुरू केला.महात्मा जोतिबा फुले आरोग्य विमा योजनेतून त्यांना उपचारासाठी पैसे देण्याचा प्रश्न मार्गी लावला.त्यांना मिळणाऱ्या योजनांमध्ये आम्ही सुधारणा केली आहे.त्यामुळे त्यांना त्याचा लाभ होईल असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.