राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते असे असतानाच काँग्रेसने कोश्यारी यांचा नवा व्हिडीओ अपलोड करून २६/११ च्या मुंबई हल्ल्यामधील हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे.या व्हिडीओनंतर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात ‘व्हिडीओ वॉर’ रंगले आहे.तर दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांनीदेखील भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच असे म्हणत संभाजीराजे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल तर राज्यात उठाव होणार असा इशारा त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ?महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये.शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच असे संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
राज्यपाल,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना २६ नोव्हेंबर रोजी अभिवादन केले.या अभिवादनादरम्यानचा व्हिडीओ काँग्रेसने ट्वीट केला आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी हुताम्यांचा अपमान केला आहे असा दावा काँग्रेसने केला आहे.काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.यासोबत त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यपालांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे.अभिवादन करताना पादत्राने बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृची आहे.महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.यासोबत त्यांनी राज्यपाल पायात चपला घालून अभिवादन करण्यासाठी जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.