नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
संविधानदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ केला.त्यात नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणचा समावेश असून येथे लवकरच पर्यटन सुरू होणार आहे.पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन नागपूर यांच्यामार्फत एक कार्यक्रम दीक्षाभूमी येथे झाला.मुख्य कार्यक्रम चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटीमध्ये झाला.दीक्षाभूमीवर भदंत सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रात आमदार प्रवीण दटके सहभागी झाले होते.व्यासपीठावर कवी ज्ञानेश वाकुडकर,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले,विलास गजघाटे,प्रदीप आगलावे,एन.आर.सोटे आदींचा सहभाग होता.
शहरातील दीक्षाभूमी,चिंचोली येथील शांतीवन,कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच कामठी परिसरातील नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिझम या चार ठिकाणांचा यात समावेश आहे.पर्यटन संचालनालयामार्फत या संदर्भातील वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.त्यानंतर येथे अत्यंत माफक दरात अनुयायांसाठी,अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही सुविधा राज्य सरकार पर्यटन विभागामार्फत उपलब्ध करून देईल.दरम्यान दीक्षाभूमिवर ‘मी रमाई बोलते’ या नाटिकेचे देखील सादरीकरण झाले.पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांच्या मार्गदर्शनात पर्यटन संचालन अधिकारी सुधीर येताळकर,अभियंते पंकज पानतावणे व पर्यटन विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.संचालन श्रद्धा भारद्वाज यांनी तर आभार पंकज पानतवणे यांनी मानले.