उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी कांग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असायला हवे ?
शिंदे गटातील रामदास कदमांची जळजळीत टीका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत नेहमी संघर्ष तसेच विरोध करून शिवसेना मोठी केली.मात्र उद्धव ठाकरे सत्तेकरिता शरद पवार यांच्या मांडीवर व सोनिया गांधी यांच्या पायाशी बसून राजकारण करीत आहेत.यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असे असायला हवे अशी जळजळीत टीका शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली आहे.
शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्ही निवडणूक लढलात मात्र मुख्यमंत्री होण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसले व शिवसेनेशी बेमानी केली त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या गटात सहभागी झालेले आमदार व खासदार गद्दार नाहीत तर तुम्हीच गद्दार आहात अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मंत्रालयात केवळ तीन वेळा आले हि बाब ग्रिनीज बुकात नोंद व्हायला हवी अशी खिल्लीही त्यांनी उडविली.तसेच आतापासून जिथे आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे सभा घेतील तिथे हा रामदास कदम सभा घेणार आणि खरे गद्दार कोण व खरे खोकेवाले कोण आहेत हे जनतेला सांगणार असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.