Just another WordPress site

“राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली तर लोकांना भाजपाने उत्तर दिले पाहिजे?”-उदयनराजे भोसलेंची आक्रमक भूमिका

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.विरोधकांकडून राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात आहे.भाजपामधूनही काही नेत्यांनी राज्यपालांचे हे विधान चुकीचे असल्याची भूमिका मांडली होती.या पार्श्वभूमवीर आज भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांचा परखड शब्दांत समाचार घेतला तसेच भाजपाचे नाव न घेता पक्षाच्या काही नेतेमंडळींना लक्ष्य केले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला होता.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.राज्यपालांनी गडकरी आणि पवारांचे कौतुक करताना शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले.छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने आदर्श झाले.नितीन गडकरी आणि शरद पवार हे आजच्या काळातले आदर्श आहेत.ते तुम्हाला इथेच भेटतील असे राज्यपाल म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना लक्ष्य करताना त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली तर लोकांना भाजपाने उत्तर दिले पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही?त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत असे उदयनराजे भोसलेंनी यावेळी सांगितले.शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला त्याचे विकृतीकरण होतेय.मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचे आहे.राज्यपालांना हटवलेच पाहिजे.राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च पद आहे राज्याचे सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

दरम्यान राज्यपालांचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावणार का? यासंदर्भात विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.आम्ही जे काय करायचे ते करतो.काळी फीत लावून वगैरे काही होत नाही.त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी ते इथे जर असते तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता असे उदयनराजे भोसले म्हणाले.त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का?असा प्रश्न विचारताच उदयनराजे म्हणाले,त्यांचा तोल गेला असता.मी कशाला त्यांना हात लावतोय.मी त्यांना हात लावला तर मला कमीपणा येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.