राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे असा आरोप महेश तपासे यांनी केला.तसेच स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचे आणि मंदिराची जागा लाटायची असे प्रकार सुरू असल्याची बोचरी टीका तपासे यांनी केली ते शनिवारी (३ डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. महेश तपासे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल झाला.स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचे आणि मंदिराची जागा लाटायची असा हा फार मोठा गंभीर प्रकार आहे.भाजपाच्या नेत्यांकडून हा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर बोलताना महेश तपासे म्हणाले,या सरकारचा कारभार नियोजनशुन्य आहे.हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला होता.या गोष्टीला एक अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायलयाने दिली आहे.महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय योग्य होते हे एक प्रकारे सिद्ध झाले आहे.जनतेच्या पैशांचा चुराडा या सरकारच्या माध्यमातून केला जात आहे.या अधिकाऱ्यांना तातडीने प्रतिनियुक्ती दिली तर जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत ठेवता येईल अशा पद्धतीचे निर्णय शिंदे सरकार घेत नाही फक्त भावनिक निर्णय आणि भावनिक गोष्टींवर राजकारण करण्यात हे सरकार व्यस्त आहे असा आरोप तपासे यांनी केला.