Just another WordPress site

“महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस,तंत्र-मंत्र यावर चालले आहे”शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाभागातील गावांवरुन सुरु असलेल्या वादावरुन शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले आहे.भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याचा इशारा दिल्याच्या मुद्द्यावरुन आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकार आणि भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस,तंत्र-मंत्र यावर चालले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल.बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत?असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच.मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे.नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच.महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ,आर्थिक क्षेत्रातील जाणकार,उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना.अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला.सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी.ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात.हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाच्या आशीष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता.आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात असा आरोप भाजपाच्या शेलारांचा होता.आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले.अर्थात विरोधी पक्ष हात चोळत बसणार नाही.तो एकजुटीने सरकारला सळो की पळो करून सोडेल.मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे.त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? असा प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत.खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्व समावेशक विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे.अध्यक्षपदी मुख्यमंत्री व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री आहेत पण हे अजय आशरच ही संस्था चालवतील कारण आशीष शेलार यांचाच दावा होता की आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत.याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्ब गोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत.पुन्हा इकडे अशी मनमानी करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केलाय त्यावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल.आता इथेही भाजपाच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ. भाजपाचे हे ढोंग आहे.कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे.महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले.महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत.‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते असे शिवसेनेने म्हटले आहे.मुळात जे छत्रपती शिवरायांचा अपमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद आहे.महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही हे लक्षात ठेवा.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आजही एका सुरात हे ठणकावून बोलायला तयार नाहीत की बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्राचाच!आणि तो पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.शिंदे-फडणवीस यांनी एकदा तरी ही गर्जना केली काय?तिकडे कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात महाराष्ट्राच्या गावांवरही दावा ठोकतात व महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त ‘अरे’ ला ‘कारे’ बोलू असे बोलतात!हे म्हणजे असेच झाले की,चीनने लडाखमध्ये घुसून आपला भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर ‘आम्ही त्यांना आमची इंचभरही जमीन त्यांना घेऊ देणार नाही असा दम भरायचा!अरे बाबांनो ते आधीच हातभर आत घुसले आहेत तसेच महाराष्ट्रात घडले आहे अशी तुलानाही या लेखात करण्यात आली आहे.

कानडी सरकारची ही ‘घुसखोरी’ फक्त नेभळट,लाचार आणि गुजरातच्या ताटाखालचे मांजर बनलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यामुळेच सुरू आहे.खोके सरकारचे आमदार महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या देतात.दुसरे आमदार शिवसेना नेत्यांना आई-बहिणीवरून कॅमेऱ्यासमोर शिव्या देतात अशा नव्या विकृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे तो एकत्रित मोडून काढावाच लागेल.शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत त्यावर ठोस भूमिका घेतली आहे असे कुठेच दिसत नाही.शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे.शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल.विरोधी पक्षाने आता नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करावा ती वेळ आलीच आहे!अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते ते लवकरच दिसेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.