नूतन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.नूतन वर्ष साजरा करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना,आप्तेष्टांना शुभेच्छा देताना तुका म्हणे असा उल्लेख करून शुभेच्छा देतात हाच शब्द प्रयोग आता महागात पडू शकतो कारण यावर देहू संस्थानने आक्षेप घेतला आहे.नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे ह्यांनी दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विडंबन करणारे शब्द प्रयोग खपवून घेतले जाणार नाहीत असेही नितीन महाराज यांनी म्हटले आहे.
नितीन महाराज मोरे म्हणाले की,तुका म्हणे ही तुकोबांची नाममुद्रा आहे.नूतन वर्ष साजरे करत असताना तरुण मुले अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा पत्रक तयार करतात.तुका म्हणे ही तुकाराम महाराजांची नाम मुद्रा आहे ती स्वाक्षरी आहे.ज्या वाक्याला आपण तुका म्हणे लावतो त्याला प्रमाण असते,वारकरी संप्रदायात ते आदराच नाम आहे.कृपा करू कोणीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना तुकोबाच नव्हे कुठल्याही संतांच्या नावाचा वापर करून चुकीचे विडंबन करू नये.राष्ट्र पुरुषाच्या नावाचा देखील असा उपयोग करू नये.छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या नावाचे जर विडंबन केले तर त्यांच्यावर देहू संस्थान कडक कारवाई करेल असा इशाराच नितीन महाराज ह्यांनी दिला आहे.या अगोदर ही अशा कारवाई केल्या गेल्या आहेत याची आठवण त्यांनी करून दिली.