जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे.दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे.एकनाथ खडसेंनी आता प्रचार थांबवला पाहिजे त्यांनी आराम करावा अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी खडसेंना उद्देशून केली होती.गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले,गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटायला लागली आहे म्हणून ते माझा प्रचार थांबवा असे म्हणत आहेत.मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे आणि मरेपर्यंत मी राजकारणात सहभागी होणार आहे.जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे तोपर्यंत मी थकणारा नाही.मी जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने संघर्ष केला आहे मी लढणार आहे.मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेला माणूस नाही.कुणाच्या मागे उभ राहून टिव्हीवर माझे चित्र आले पाहिजे असे मी कधीही केले नाही. मी कुणाच्या मागे उभा राहिलो नाही.लोक माझ्या मागे उभे राहिले आणि ते टिव्हीवर झळकले त्यांची लाचारी असते मी लाचार नाही.मी विश्वासाने जगणारा माणूस आहे त्यामुळे मी लढत राहणार असे प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिले आहे.गिरीश महाजनांना उद्देशून खडसे पुढे म्हणाले,यांच्या वडिलांना म्हातारपण आले नसेल का?किंवा माझ्या आई-वडिलांना म्हातारपण आले नाही का?यांना म्हातारपण येणार नाही का?यांनाही म्हातारपण येणारच आहे पण मन तरुण लागते असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे.