मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन (एलटीटी) मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटण्याची क्षमता वाढणार आहे.या टर्मिनसवर दोन नवीन फलाट बांधले जात असून हे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.त्यानंतर नवीन फलाट येताच या टर्मिनसवरुन २४ डब्यांच्या आणखी काही गाड्या सोडण्यात येणार आहेत.त्यामुळे सीएसएमटीवरील मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटण्याचा भारही हलका होणार आहे.सीएसएमटी,दादर येथून मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटतात.तेवढ्याच एक्स्प्रेस गाड्या पुन्हा येतात.गर्दीच्या काळात तर विशेष गाड्यांचीही भर पडत असते.याशिवाय एलटीटीतूनही दररोज ३२ ते ३६ गाड्यांची ये-जा होत असते.तरीही गेल्या काही वर्षात प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,एलटीटी स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढत आहे.जागा उपलब्ध नसल्याने या तीन स्थानकांवर ताण पडतो आणि मध्य रेल्वेचे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन काहीसे बिघडते.या पार्श्वभूमीवर एलटीटीत २४ डब्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी आणखी दोन नवीन फलाट बांधण्याचा निर्णय घेतला यामध्ये फलाट,रुळांसह अन्य तांत्रिक कामेही हाती घेण्यात आली आहेत.
सध्या एलटीटीत एक ते पाच फलाट असून २४ डब्यांच्या एक्स्प्रेस येथून सुटतात आणि येतात.दोन नवीन फलाट उपलब्ध झाल्यास मेल-एक्स्प्रेसची संख्याही वाढेल शिवाय सीएसएमटीवरील काही गाड्या एलटीटीवर वळत्या करण्याचे नियोजन आहे.सध्या नवीन फलाटाचे काम सुरू असून डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर या दोन फलाटातूनही मेल-एक्स्प्रेस सोडण्यात येतील असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंह यांनी सांगितले.या फलाटांच्या कामांसाठी एकूण २० कोटी रुपयांचा खर्च असल्याची माहिती त्यांनी दिली.सीएसएमटीतून एक्स्प्रेसची ये-जा वाढल्याने मध्य रेल्वेने २००३ मध्ये प्रथम एलटीटीचा विस्तार केला होता.त्यानंतर नवीन एलटीटी स्थानकाचीही उभारणी एप्रिल २०१३ मध्ये करण्यात आली आता या टर्मिनसचा विस्तार करण्यात आला.याबरोबरच सीएसएमटीतील गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी फलाटांच्या विस्ताराचेही काम सुरू आहे.सीएसएमटीतील फलाट क्रमांक १० आणि ११ फक्त १३ डब्यांच्या गाड्या तर फलाट क्रमांक १२ आणि १३ हे १७ डब्यांच्या गाड्यासाठी आहेत.२४ डब्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी या चार फलाटांचा विस्तार करण्याचे कामही सुरू आहे.एलटीटीत नवीन फलाट बांधण्याचे काम सुरू असल्याने नेत्रावती,मत्स्यगंधा,कामख्या एक्स्प्रेस सध्या पनवेलमधून सोडण्यात येत आहेत.१२ डिसेंबरनंतर या गाड्या पुन्हा एलटीटीमधून सोडण्यात येणार आहेत.