मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कर्नाटक सरकारकडून अचानकपणे राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात आहे त्यामुळे हे प्रकरण साधेसोपे नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून राज्याच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळून टाकावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली.ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे सीमाप्रश्नावर मनसेची भूमिका स्पष्ट करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये.महाराष्ट्राच्या गाडय़ांची तोडफोड,तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरू आहेत ते तात्काळ थांबण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.त्याच वेळी समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला मनसे आणि इथली मराठी जनता तयार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद उफाळून यावा ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरू झाले आहेत.तिकडून कर्नाटकातून कोण खतपाणी घालतेय हे तर उघड दिसते आहे, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का हे सरकारने पाहायला हवे.हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा,पण जर समोरून संघर्षांची कृती केली जाणार असेल तर,मात्र मनसे काय करू शकते ह्याची चुणूक महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचे उत्तरपण तितकेच तीव्र असेल असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात एकजिनसीपणा आहे,आज इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत.थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे त्यामुळे संघर्ष होऊच नये.