Just another WordPress site

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद:.महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने घेतली अमित शाह यांची भेट

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर हा वाद निवळण्याची आशा होती पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.विशेष म्हणजे त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन काहीही होणार नाही असे सांगत थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.यावर ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना टीका केली आहे.बोम्मई यांनी पुन्हा एकदा ट्वीट केले असून महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही.महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे.सीमावादावर आमचे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असे बोम्मई म्हणाले आहेत.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे त्यांना कदाचित केंद्र सरकारचे आशीर्वाद असतील.पण आम्ही काल जेव्हा अमित शाह यांना भेटलो तेव्हा त्यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि १४ तारखेला दोन्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो असे सांगितले पण हे लोक केंद्र आणि वरिष्ठ नेत्यांनाही जुमानत नाहीत असा अर्थ होतो अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.न्यायिक व्यवस्थेला तुम्ही मानता की नाही? सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित असतानाही अशी वक्तव्य केली जात आहेत त्यांनी याआधीही अशा गोष्टी करुन दाखवल्या आहेत.देशाच्या संविधानाला,न्यायव्यस्थेला जुमानायचे नाही असे त्यांनी ठरवले आहे.केंद्राने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.भाजपाचे इतके खासदार असताना,राज्य सरकार असतानाही कोणतीच भूमिका घेतली जात नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पंडित नेहरु यांच्या चुकीमुळे जो मराठीभाषिक प्रदेश राज्य पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून बाहेर गेला तो पुन्हा महाराष्ट्रात आलाच पाहिजे. बेळगाव,मराठी भाषिक आणि आसपासचा भाग महाराष्ट्रात यावा अशी आपली स्पष्ट भूमिका आहे असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले “ते काय सुप्रीम कोर्ट नाहीत.सीमावादाचा लढा सुप्रीम कोर्टात असून तिथे न्याय दिला जाणार आहे ते काय सरन्यायाधीश नाहीत कारण नसताना भूमिका मांडत आहेत.पण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आमने-सामने आहेत म्हणजे खरगे कर्नाटकचा भाग महाराष्ट्राला द्या असे म्हणणार नाहीत असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.हा राजकीय पक्षाचा विषय नाही.महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील राजकीय पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पण बोम्मई यांना असे भाष्य करण्याचा कोणताही हक्क नाही.बोम्मई यांनी पुन्हा असे भाष्य केल्यास यापेक्षा तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी शुक्रवारी संसदेतील कार्यालयात शहांची भेट घेऊन सीमाभागांतील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा मांडला.केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी या खासदारांनी केली.गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यानंतर दोन दिवसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दिल्लीत चर्चा करू असे आश्वासन शाह यांनी दिले आहे.

राष्ट्रीय धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय बेळगावमध्ये असून सीमाभागांतील मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याचा अहवाल दरवर्षी या आयोगाकडून केंद्राला दिला जातो.कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी भाषकांवर अत्याचार करत असल्याचे सिद्ध होते असा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी शहांशी झालेल्या चर्चेत मांडला.सीमाप्रश्नी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची गरज असून ती एकतर्फी असू नये असाही मुद्दा सावंत यांनी उपस्थित केला.त्यावर आयोगाच्या अहवालाची दखल सर्वोच्च न्यायालय घेईल.हा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे असे शाह यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अन्य खासदारही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.