जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा कल प्राप्त होत आहे.जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे.यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.यात शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश तर सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक चुरशीची झाली.निवडणुकीच्या काळात अनेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला.मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला होता.या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंग रोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला.यात अरविंद देशमुख आणि संजय सावकारे यांनी अनुक्रमे अनुसूचित जमाती आणि
अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय संपादन करत शेतकरी विकास पॅनलचे विजयाचे खाते उघडले.यानंतर ओबीसी प्रवर्गातून पराग वसंतराव मोरे यांनी गोपाळ भंगाळे यांचा पराभव करत सहकारचे खाते उघडले.तर महिला प्रवर्गातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली.यात सहकारच्या छायाताई गुलाबराव देवकर आणि शेतकरी विकासच्या पूनम प्रशांत पाटील यांनी विजय संपादन केला.यानंतर उत्सुकता लागून असलेल्या मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांनी निर्णायक आघाडी घेतली.तर उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा कल प्राप्त होत आहे.