Just another WordPress site

…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.सहज शपथविधी कार्यक्रमानंतर चालता चालता बोलायला सीमा प्रश्न इतका खालच्या दर्जाचा वाटला का?असा प्रश्न राऊतांनी विचारला तसेच सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपला असा आरोप केला ते आज मंगळवार दि.१३ डिसेंबर २२ रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.संजय राऊत म्हणाले,गाजलेला पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्र्यांचा संपर्क जास्त होता.राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृहमंत्रालयाच्या अधीन येतात त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गृहमंत्रालय काम पाहते त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्रीच असतात त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींऐवजी आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिले आहे तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल.आज पुण्यात बंद आहे.पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे त्यांचे संपूर्ण काम पुणे आणि रायगडातून पुढे गेले.आज पुण्यात कडकडीत बंद सुरू असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी,महाराष्ट्र सरकारने आणि राज्यपालांनी घ्यायला हवी.राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची दखल महाराष्ट्रावर झाला नाही हे पुणेकर दाखवून देत आहेत.बंदचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला.

संजय राऊत पुढे म्हणाले,१७ डिसेंबरला शिवसेनेसह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण महाविकासआघाडीचा मोर्चा आहे.हा त्याच कारणासाठी आहे.आमचे दैवत शिवरायांचा,महात्मा जोतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आहे त्याविरोधात हा मोर्चा आहे याचीही दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रस्त्यावर भेटले असे ऐकले.रस्ता ही काय सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का?जाता जाता,चालता चालता,कॉफी शॉपमध्ये,एअरपोर्ट लॉनमध्ये,एअरपोर्टच्या लॉबीत भेटण्याची जागा आहे का?असा सवाल संजय राऊतांनी विचारला.सहज भेटले म्हणून बोलले मात्र हा अतिशय गंभीर प्रश्न आहे.हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे.सहज दोन मुख्यमंत्री गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेले,जाता येता भेटले आणि सीमा प्रश्नावर चर्चा झाली.इतका सीमा प्रश्न कमी महत्त्वाचा खालच्या दर्जाचा आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

राऊत म्हणाले,महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे की,कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत,बदनामी करत आहेत,धमकी देत आहेत आणि तुम्ही सहज चालता चालता भेटत आहात आणि चर्चा करत आहात.हा महाराष्ट्राचा अपमान आहे त्यांनी हे बाहेर तरी सांगू नये.ज्या प्रश्नावर लोक ५५-६० वर्षे संघर्ष करत आहेत,लढत आहेत,शहीद होत आहेत,मान-अपमान सहन करत आहेत तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपता.मला या सरकारच्या प्रसिद्धी विभागाचे आश्चर्य वाटत आहे असेही राऊतांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.