मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.त्याचवेळी मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहे.मलिक हे त्यांच्या पसंतीनुसार खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर दुसरीकडे अनेक कैद्यांना अशी सुविधा मिळत नाही याचाही विचार करायला हवा असेही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना म्हटले.तसेच वैद्यकीय गरज भासल्यास मलिक हे सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागू शकतात असेही न्यायालयाने स्पष्ट केले.मलिक यांनी नियमित जामीनाचीही मागणी केली आहे. त्यावरील सुनावणी न्यायालयाने ६ जानेवारी रोजी ठेवली आहे.
विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यावर मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.प्रकरणातील मुख्य साक्षीदार मुनिरा प्लम्बरच्या जबाबात त्रुटी आढळल्यावरही विशेष न्यायालयाने आपल्याला जामीन नाकारल्याचा दावा मलिक यांनी उच्च न्यायालयातील याचिकेत केला आहे असे करून विशेष न्यायालयाने मलिक यांच्या गंभीर वैद्यकीय स्थितीकडे दुर्लक्ष केले आहे असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.मलिक हे सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत दरम्यान मलिक हे खरोखर गंभीर आजाराने त्रस्त आहेत तर त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या मागणीला त्यांनी स्वत:हून परवानगी का दिली नाही?असा प्रश्न विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताना उपस्थित केला होता.तसेच तपशीलवार वैद्यकीय अहवालांच्या अनुपस्थितीत आणि वैद्यकीय मंडळाने मलिक यांची तपासणी न केल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मलिक यांची जामिनाची मागणी फेटाळताना स्पष्ट केले होते.