राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते.त्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांच्या विधानाचा निषेध करत त्यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान काल या विरोधात विविध संघटनांकडून ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली होती.या ‘बंद’ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इतर राजकीय संघटनांनीही समर्थन दिले होते.तसेच याबाबत बोलताना हा बंद बेकायदेशीर असल्याची टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.सदावर्तेंच्या या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलण्यात अर्थ नाही.त्या माणसाला नवणीत राणा मातोश्रीवर घुसण्याच्या प्रयत्न करतात,ते कायदेशीर वाटते,एसटी कामगार ‘सिल्वर ओक’वर घुसण्याचा प्रयत्न करतात,ते कायदेशीर वाटते. मात्र आम्ही सनदशीर मार्गाने आमचा निषेध नोंदवत असताना ते बेकायदेशीर वाटते.यावरून सदावर्तेंचा आणि कायद्याचा किती संबंध असेल हे लक्षात येईल.ईश्वर त्यांना क्षमा करो असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.
यावेळी बोलताना,१७ डिसेंबर रोजी राज्यापालांविरोधात महाविकास आघाडीकडून महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.त्यासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली.या महामोर्चाचे स्वरूप महाराष्ट्र पातळीवरचे आहे.सर्व पक्षाचे सर्व नेते या आंदोलनात सहभागी होतील.महाराष्ट्रातील जनताही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहे जर राज्यपालांना पदावरून हटवले नाही तर जो आक्रोश आज पुण्यात दिसतो आहे तो आक्रोश महाराष्ट्राच्या गावागावात दिसेल असेही त्या म्हणाल्या.दरम्यान काल आयोजित ‘पुणे बंद’ बाबत बोलताना,हा बंद बेकायदेशीर असल्याची टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली होती.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेकदा ‘बंद’ बेकायदेशीर आहेत असे सांगितले होते मात्र तरीही काल पुण्यात बंद घोषित करण्यात आला आहे.कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले होते.