शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधान,कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलेले असताना यावरून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला?यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी खोचक टीका केल्यानंतर आता संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना चित्रा वाघ यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून टीका केली होती.रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील याचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही,मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे.इतके सामान्य ज्ञान असू नये?आमचे आदर्श असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे,तुमचा जाहीर निषेध असेही चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या.
दरम्यान चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का?त्या नात्याने आम्ही म्हटले की ते आमचे आहेत त्यांचा जन्म भारतातच झालाय.आंबेडकरांचा जन्म १८९१ साली आत्ताच्या मध्य प्रदेशात झाला तेव्हा मध्य प्रदेश नव्हते फक्त एकच मुंबई प्रांत होता.भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा त्यांना कळते का?अभ्यास त्यांनी करायचाय असे संजय राऊत म्हणाले.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा देशात कोणतेही राज्य नव्हते.आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल,कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत हे स्पष्ट होतेय.भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळतेय.त्यांच्या जिभेवर काय,डोक्यात काय,पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.आंबेडकर, फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत” अशा शब्दांत संजय राऊतांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्र सोडले आहे.