मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.दुसरीकडे राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा,ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल असे वक्तव्य केले.यावर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मनसेही महायुतीत सहभागी होणार का?असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावर सत्तारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते शुक्रवारी (१६ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.अब्दुल सत्तार म्हणाले,मनसेने कोणाबरोबर जायचे हे राज ठाकरे ठरवतील.राज ठाकरे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील.राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे.आमच्या सर्वच नेत्यांनी त्यांना आमच्याबरोबर येण्याचे आव्हान केले आहे परंतु शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे.ते काय निर्णय घेणार हे इतर कोणालाही सांगता येणार नाही असे मत अब्दुल सत्तारांनी व्यक्त केले.
महाविकासआघाडीच्या महामोर्चावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले,महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये इतकी दक्षता ठेवावी.शेवटी मोर्चा काढण्याचे काही नियम आणि धोरण आहे त्यांनी त्याचे पालन करावे आणि मोर्चा काढावा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसे स्पष्ट सांगितले आहे की,आम्ही कोणालाही अडवलेले नाही असेही सत्तारांनी नमूद केले.अब्दुल सत्तारांनी ठाकरे गटालाही टोला लगावला.ते म्हणाले,ठाकरे गटाला खिंडार तर पडलेले आहे.खिंडार पडलेल्या पक्षाला आणखी किती खिंडार पाडणार.आज शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी घोषणा करतील त्या आदेशाचे कृषी विभाग तंतोतंत पालन करेल असे त्यांनी म्हटले आहे.