चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिले होते.केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊ द्या,नियमांचे पालन करा नाहीतर यात्रा रद्द करा असा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता.दरम्यान या पत्रानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर लक्ष्य केले आहे.भारत जोडो यात्रेस कायद्याने,कारस्थानाने रोखता येत नसल्याने ‘कोव्हिड १९’चा व्हायरस केंद्र सरकारने सोडलेला दिसतो आहे अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’यात्रा गुंडाळावी असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सुचविले आहे.राहूल गांधी यांच्या यात्रेस १०० दिवस पूर्ण झाले आहे तसेच या यात्रेस जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे.भारत जोडो यात्रेस कायद्याने,कारस्थानाने रोखता येत नसल्याने ‘कोविड १९’ चा व्हायरस केंद्र सरकारने सोडलेला दिसतो आहे अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रेतील गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो ही भीती खरी आहे पण तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक उसळला असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गुजरातेत बोलावून त्यांच्या सन्मानार्थ लाखो लोक गोळा करणारे तुम्हीच होता.अमेरिकेतून येणारे कोरोना घेऊन येतील ही भीती तेव्हा अनेकांनी व्यक्त केली होती पण पंतप्रधान मोदी यांनी ऐकले काय?मग आताच कोरोनाचे असे राजकीय भय का वाटावे?असा प्रश्नही शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.चीनमध्ये कोरोनाचा कहर माजलाय हे खरे पण याच काळात गुजरात विधानसभा निवडणुका पार पाडल्या व अगदी मतदानाच्या दिवशी आचारसंहितेची ऐशी की तैशी करत पंतप्रधान मोदी हे ‘रोड शो’ करीत मतदान केंद्रावर पोहोचले होते.त्या आधीही गुजरातमध्ये जागोजागी मोदी यांचे भव्य ‘रोड शो’ झाले.भारत जोडो यात्रा स्थगित करावी असे सांगणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना हे गर्दीचे रोड शो कोरोना वाढवतील असे वाटू नये याचे आश्चर्य वाटते अशी टीकाही सामानातून करण्यात आली आहे.