राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल असे केसरकर म्हणाले आहेत.केसरकरांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे शनिवारी अमरावतीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर उपस्थित होते.यावेळी प्रवीण पोटे यांनी अजित पवारांबद्दल मोठ विधान केले होते.अजित पवारांनी पहाटेच्याऐवजी दुपारी शपथ घेतली असती तर ते आता मुख्यमंत्री असते असे विधान पोटेंनी केले.पोटे यांच्या विधानाबाबत दीपक केसरकरांना विचारले असता अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल असे विधान केले आहे ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
प्रवीण पोटेंच्या विधानावर भाष्य करताना दीपक केसरकर म्हणाले,राजकीय नेत्यांची राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो.आम्हाला सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे.अजित पवारही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मोकळेपणाने बोलतात त्यामुळे मला वाटते की प्रवीण पोटे यांनीही मैत्रीपोटी किंवा आदरापोटी ते विधान केले असावे.अजित पवार आमच्या सगळ्यांबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय हे सगळ्यांनी बघितले आहे त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही असे विधान केसरकर यांनी केले आहे.