Just another WordPress site

“हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले”शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आणि गेल्या दोन आठवड्यांपासून नागपुरात चालू असलेला राजकीय आखाडा शांत झाला पण त्याचे पडसाद मात्र राज्यभर उमटले.अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.एकीकडे अधिवेशनातला राजकीय आखाडा शांत होत असताना दुसरीकडे नव्या वर्षाच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे.या पार्श्वभूमीवर ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे तसेच ‘नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय?’असा सवालही उपस्थित केला आहे.सरत्या वर्षात लोकशाही मूल्यांची हत्या झाल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.‘हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले.पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले.सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की,धुऊन-पुसून स्वच्छ अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली.केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई,बेकारी,ढासळलेली अर्थव्यवस्था,डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच.पुन्हा यावरून प्रश्न विचारेल त्यांना ब्लॅकमेलर्सचा वापर करून तुरुंगात डांबलेच म्हणून समजा असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.दरम्यान महाराष्ट्रातील सत्तांतराचाही दाखला ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले.एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच २०२२ ची नोंद इतिहासात होईल.दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण’ असे यात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.