“भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचे प्रतिक,आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार”-जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट
कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो दरम्यान महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी शौर्य दिनाला विरोध केला असून शासकीय कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे यानंतर वादाला तोंड फुटले आहे.सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे.त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.जितेंद्र आव्हाड यांनी १ जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असल्याचे म्हटले आहे.भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचे प्रतिक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते.तेव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
अजय सेंगर यांनी साम या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.ते म्हणाले की,इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्य दिन कसा काय साजरा होऊ शकतो.आम्ही मागणी करत आहोत की,गद्दारांचा शौर्य दिन साजरा होऊ नये.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत की,राज्य सरकारने तिथे बुलडोझर चालवावा.ही जातीय लढाई नव्हती.ही इंग्रजांविरोधात केलेली लढाई होती याला जातीय स्वरुप देऊ नये अशी मागणी देशातील समस्त हिंदू,बौद्ध यांना केली आहे.हिंदू-बौद्ध एकतेसाठी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या १ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी.करणी सेनेकडून १ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभा घेणार आहे.इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा भारतीयांनी उदो उदो करु नये असेही ते म्हणाले.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली राजकीय चूल पेटवण्याकरता या छोट्याश्या चकमकीला जातीय स्वरुप देण्यात आले असाही आरोप सेंगर यांनी केला आहे.
खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली की,करणी सेनेची ही मागणी अत्यंत चुकीची आहे.त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ साली स्वाभिमानासाठी आणि जातीअंतासाठी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले या युद्धामध्ये महार सैनिकांचा विजय झाला यामुळे हा भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहोत की,अजय सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी.