यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा फाट्यावर स्पीडब्रेकर विना वाहन चालविणे फार धोकेदायक झाले असल्याने याठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी गावकरी वर्गातून केली जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि,बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर डोंगर कठोरा हे टुमदार खेडेगाव वसलेले आहे.या गावातील रहदारी मुख्यत्वे करून डोंगर कठोरा सांगवी या रस्त्यावरूनच होत असते.त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात होत असते.या रस्त्यालाच लागून डोंगर कठोरा फाटा आहे.महामार्गाला लागून या फाट्यामुळे त्रिफुली तयार झालेली आहे.याठिकाणी यावल कडून फैजपूर कडे व तशीच फैजपूर कडून यावलकडे वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असतात.मात्र या त्रीफुलीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहन चालविणे मोठे धोकेदायक झालेले आहे.डोंगर कठोरा गावाकडून येणाऱ्या वाहन धारकांना या दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनांचा रस्त्याच्या आजूबाजूची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्यामुळे अंदाज येत नसून या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.त्याचबरोबर याच रस्त्यावर दोन ठिकाणी दोन अपघाती नागमोडी मोड आहेत.याठिकाणी आजवर लहान मोठे अनेक अपघात झालेले आहेत.याठिकाणी देखील अपघात दर्शक फलक लावण्यात यावे व स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे.अशी डोंगर कठोरा गावकरी,प्रवाशीवर्ग व वाहनधारक यांच्याकडून मागणी केली जात आहे.
तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरवून या ठिकाणी तीनही बाजूकडून स्पीडब्रेकर टाकण्यात यावे व पुढील होणारा धोका टाळावा अशी आग्रही मागणी डोंगर कठोरा ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे.