प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय हा दुग्धशर्करा योग-जितेंद्र आव्हाडांचे सूचक विधान
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे युतीसंदर्भात चर्चांना आणखी जोर मिळाला.या घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपण शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असून आमचा काँग्रेसला कधीही विरोध नव्हता.युतीबाबतचा निर्णय आता उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे असे विधानही वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर संभाव्य युतीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.परंतु वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचा विरोध होता अशी चर्चा होत होती.मात्र याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत सूचक विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय घेतला हा दुग्धशर्करा योग आहे असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर युतीला राष्ट्रवादीने हिरवा कंदील दिला का?याबाबत चर्चांना उधाण आले आहे.ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की,“मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेतील नेता नाही परंतु सामाजिक दृष्टीकोनातून जेव्हा मी राजकारणाकडे पाहतो तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत घेतलेला निर्णय हा दुग्धशर्करा योग आहे.महाराष्ट्रात सध्या धर्मांधता व जातीय द्वेष मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा काळामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी पक्षांसोबत जाण्याच्या निर्णयामुळे समविचारी पक्षाचे बळ वाढण्यास मदत होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.