भुसावळ व सावदा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का;नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
भुसावळ व सावदा परिसरात काल दि.२७ जानेवारी रोजी सकाळी १०.३५ वाजेच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.सदरील धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याबाबत शासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.याबाबत प्रशासन सतर्क असून नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्र.२०५७-२२२३१८० व ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर साधायचा आहे.भूकंपादरम्यान काय करावे व काय करू नये याबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
भूकंपा दरम्यान घ्यावयाची काळजी-जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सुचना जारी :-
जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असतांना इमारतीच्या आत असाल तर ? *घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा गया.(उदा.टेबलाखाली,बीमखाली,तुळईखाली,दरवाजाच्या चौकटीखाली,कॉलम जवळ). लिफ्टचा वापर करू नका.दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका.स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा.संबंधित यंत्रणांना त्वरित कळवा.
तर तुम्ही रस्त्यावर असाल तर ? *पटकन मोकळ्या जागेत जा,घाई-गडबड,दंगा करू नका.उंच,जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून,भिंती,विजेच्या तारांपासून लांब थांबा.
भूकंपादरम्यान काय करावे ? *जमिनीवर पडा,मजबूत टेबलाखाली आसरा घ्या.जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा.जर जवळ टेबल नसेल तर जमिनीवर झोप,पाय पार्श्वभागावर घ्या,डोके गुडघ्याजवळ घ्या,डोक्याच्या बाजू कोपऱ्याने झाकून घ्या आणि हात मानेभोवती घ्या.तुम्ही एखाद्या जागेत आतमध्ये धक्के बसने बंद होईपर्यंत आतच राहा.भूकंपाच्या धक्क्यावेळी बेडरूममध्ये असल्यास उशीच्या साहाय्याने डोके वाचवा.
भूकंपानंतर काय करावे ? *रेडिओ/टीव्ही वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा.अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका.जुन्या इमारती,नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा,दगडी भिंतीपासून दूर रहा.पाणी,वीज,गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा.बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून त्याबाबतची माहिती घ्या.जर काही व्यक्ती जमिनीच्या आत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा.शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा.
अशा भूकंप मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे जारी करण्यात आलेल्या आहेत.तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.