नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
राज्यात एकीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र आहेत तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती झालेली आहे.सदरील युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हि परिस्थिती राज्यात असतांनाच एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीकरीता खुली ऑफर दिलेली आहे.यात महाविकास आघाडीने एमआयए सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत युतीबाबत चर्चा करावी असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे.ते पुढे म्हटले आहे की,मी याआधीही महाविकास आघाडीला युतीबाबत ऑफर दिलेली होती.परंतु मुस्लीम समाज म्हणजे आमचीच मालमत्ता असल्याचे या अगोदर राजकीय पक्षांना वाटायचे व मुस्लीम समाजाची मते आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही असा त्यांचा गैरसमज होता.आमच्या पक्षामुळे भाजपाला फायदा होतो असे काही जणांना वाटत असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहोत व याबाबत मी याअगोदर देखील अशी ऑफर दिलेली आहे. याकरिता असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत चर्चा करा आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत तसेच तुम्हीही आमच्यासोबत यावे असे इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांना खुली ऑफर दिली आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केलेली आहे.यामुळे उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे सध्यातरी आमची युती फक्त ठाकरे गटाशी असून आम्हाला महाविकास आघाडीबद्दल काहीही माहिती नसल्याबाबतची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार की नाही?हे पाहणे मोठे महत्त्वाचे ठरणार आहे.