स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाची चौकशी करण्याची मागणी
अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा अशोक तायडे यांचा इशारा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अनेक ठिकाणी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व भोंगळ कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन अभीयानाचा पुरता फज्जा उडाला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत यांच्यामार्फत बोगस ठराव करून शासनाच्या निधीची लुट करण्यात आली असून याबाबत निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.लवकरच यावल न्यायालयामध्ये देखील चौकशी करीता अर्ज दाखल करणार असुन सदरील भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी अन्यथा ३०जानेवारी २३ पासून यावल पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.
यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगर कठोरा,पाडळसा,सावखेडा सिम,थोरगव्हाण,वड्री,निमगाव,गिरडगाव,कासारखेडा, चिंचोली,आडगाव,म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या माध्यमातून गावाच्या आजूबाजूला ८ ते १o शौचालय एका गावामध्ये ४०० ते ५०० लाभार्थी यांना वैयक्तिक ठेकेदाराकडून १२ooo रुपये प्रमाणे देण्यात आली आहे.शासकीय माहीतीवरून ही गाव मात्र हगणदारी मुक्त झालेले असून या गावांना सरकारकडून पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत.तरीदेखील शौचालय बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मधून बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी ग्रामसभेत न चर्चा करता खोटे ठराव मंजूर करून पंधराव्या वित्त आयोगातून गावच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेबाबत कोणतेही नियोजन न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी सरकारची दिशाभूल करून शासननिधीचा मोठया प्रमाणात अपहार केलेला आहे.परिणामी सदरील बोगस कामांची चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा ३० जानेवारी २३ पासुन यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निळे निशाण सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.