यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनीतर्फे तालुक्यातील हिंगोणा येथे पहिला नैसर्गिक कोळसा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीन हजार कोटींची उलाढाल होणार असुन या प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासोबतच त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.तसेच रोजगार निर्मिती होऊन परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत मिळणार आहे.सदरील प्रकल्पामुळे तालुक्यात फार मोठी अर्थिक क्रांती घडून येणार आहे.किसान प्रोड्युसर कंपनीचे सामाजिक दायित्व म्हणून उत्पन्नातील २० टक्के हिस्सा समाजासाठी देणार असल्याचे कंपनी सल्लागार दिपक गोकुळ पाटील यांनी सांगितले आहे.
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या प्रकल्पाचे उदघाटन तालुका कृषी अधिकारी सागर शिणारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.यावेळी बोलतांना शिणारे म्हणाले की,अश्या प्रकल्पांची तालुक्याला व देशाला खूप आवश्यकता आहे व आज पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एमसीएल सारखे प्रकल्प त्यासाठी वरदान ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.तर आपला भारत देश इंधनासाठी आखाती देशांकडून ८ लाख करोड रुपयांचा कोळसा खरेदी करीत आहे.कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे आपल्या देशातील पैसे बाहेरील देशात जात आहे.तसेच ग्लोबल वार्मिंग,प्रदूषण,नैसर्गिक आपत्ती व बेरोजगारी अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या सर्व समस्या सोडविण्यासाठी एमसीएल कंपनी जैविक कोळसा व एमसीएनजी जैविक खते तसेच पर्यावरण पूरक प्रॉडक्ट तयार करणार असून त्यातून तालुक्यात रोजगार निर्माण होईल तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शाश्वत उत्पन्न मिळेल.त्याचबरोबर एक हजार रुपये टन भावाने हत्ती गवत खरेदी केले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना एका एकरातून वर्षा काठी दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळेल असे एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली. कंपनी सल्लागार दिपक पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अध्यक्षा सौ.ज्योत्स्ना दिपक पाटील,सेवानिवृत्त कृषी अधिकारी ए.टी चौधरी,व्ही.ई. पाटील,एम.सी.गाजरे,एच.टी.पाटील,राहुरी कृषी विद्यापीठ सीनियर बिडीए गजेंन्द्र सोनवणे,बिडीए शिवाजी पाटील,डायरेक्टर गोकुळ पाटील,नामदेव पाटील,शुभम पाटील,जळगांव जिल्ह्यातील तालुका उद्योजक,४४ ग्राम उद्योजक,फिल्ड ऑफिसर व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व ग्राम उद्योजक यांचे अनमोल सहकार्य लाभले.