यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत मधील दलीत वस्तीचे रजिस्टरच गायब असल्याचा गजब प्रकार समोर आला आहे.सदरील बाब ही संविधान रक्षक दल भीमआर्मीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून उघड केली आहे.त्यामुळे या घटनेबाबत तालुकावासीयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतमध्ये सुपडू संदानशिव यांनी विद्यमान ग्रामसेवक सौ.प्रियंका बाविस्कर यांच्या कडे माहिती अधिकाराखाली २०१७ ते आज पावेतो दलीत वस्तीत झालेल्या विकास कामांची माहिती मिळणे बाबत माहिती मागितली होती.सदरील प्रकाराबाबत जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक सौ.प्रियंका बाविस्कर यांना विचारणा केली असता मला तत्कालीन ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी योजनेचे दप्तर ताब्यात दिलेले नसल्याने मला माहिती देता आली नाही व सदर ग्रामसेवक बाबत मी अहवाल दिलेला आहे व अपीलार्थी यांना दि.१५ ऑगस्ट २२ च्या पत्रानव्ये कळविले आहे.तसेच तत्कालीन ग्रामसेवक यांना या कार्यालया मार्फत नोटीस बजावून सदर ग्रामसेवक यांचे कडून दप्तर उपलब्ध करून विद्यमान ग्रामसेवक यांनी ग्रा.पं. कार्यालयात असलेली सर्व माहिती दप्तर उपलब्ध झाल्या नंतर १० दिवसाचे आत विनामूल्य पुरविण्यात यावी,असे सुपडू संदानशिव यांना आलेल्या पत्रकात म्हटले आहे.मात्र आज पावेतो ३ महिने उलटूनही ग्रामसेवक यांनी माहिती दिलेली नाही.याबाबत खुलासा व्हावा म्हणून सुपडू संदानशिव यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दाखल केला असता त्यांनी दिलेल्या माहितीद्वारे असे दर्शनास आले आहे की,सदर दलीत वस्तीचे रजिस्टर हे गायब झाले असल्याचे दिसून येत आहे.सदरील प्रकारामुळे पंचायत समिती प्रशासनाबाबत तालुकावासीयांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत तत्कालीन ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे यांनी विद्यमान ग्रामसेवक सौ.प्रियंका बाविस्कर यांना दप्तर ताब्यात न दिल्या बाबत गटविकास अधिकारी यावल यांच्या वतीने पत्र पाठविण्यात आलेले आहे.सदरील पत्रात नमूद करण्यात आले आहे की,संदर्भीय विषयानुसार आपण यावल तालुक्यातून निलंबित झाल्याने तसेच धरणगाव तालुक्यातील पूर्वस्थित झाल्याने आपले कडील ग्रा.पं चुंचाळे येथील दलीत वस्ती योजनेचे दप्तर विद्यमान ग्रामसेवक सौ.प्रियंका बाविस्कर यांच्या ताब्यात न दिल्याने त्यांना माहिती अधिकारातील माहिती देतांना अडचणी निर्माण होत आहे तरी आपण सदर गावाचे दलीत वस्ती सुधार योजनेचे व इतर दप्तर विद्यमान ग्रामसेवकांना ताब्यात देणे बाबत कार्यवाही करावी.तरी आपण तात्काळ दप्तर विद्यमान ग्रामसेवकांच्या ताब्यात न दिल्यास आपणा विरुद्ध मुंबई ग्रा.पं अधिनियम १९५८ चे कलम १७९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करणे बाबत म.जिल्हाधिकारी जळगांव यांच्या कडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे म्हटले आहे.आज तीन महिने होवूनही अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नसून दलीत वस्तीचे दप्तर गायब झाल्याने गावातील दलीत वस्ती मधील कामांचा विकास होईल कसा?संबधित ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांच्यावर अद्यापि कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने संबधित ग्रामसेवक व अधिकारी यांच्यात साठे लोटे आहेत का?असे प्रश्न तालुकावासीयांमध्ये उपस्थित केले जात आहेत.