यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर,टेक्निकल ऑफिसर,डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांच्या वतीने येथील यावल पंचायत समिती आवारामध्ये एकदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन नुकतेच करण्यात आले.
रोजगार हमी योजना ही योजना सन २००५ पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राबविली जात आहे.सदरील योजनेच्या माध्यमातून सध्या अत्यंत तटपुंज अशा मानधनावर अनेक कर्मचारी व रोजगार सेवक काम करीत आहेत.यात केंद्र सरकारच्या २६४ विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत नियमित व अखंडपणे पोहचविण्याचे कार्य हे कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक करीत आहे.राज्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तसेच शेतकरी,शेतमजूर व भूमीहीन अशा विविध प्रकारच्या घटकांना शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून शासनाला हातभार लावण्याचे मोलाचे काम कर्मचारी व रोजगार सेवक यांच्या वतीने अहोरात्र केले जात आहे.तरीही केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.देशभरातील इतर सात राज्यांमध्ये या घटकांना सन्मानपूर्वक पोटाला मिळेल एवढे मानधन किंवा मासिक वेतन दिले जात असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील त्यांना ते देण्यात यावे.त्याचबरोबर मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे,पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे,योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी,मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या ६२ वर्षापर्यंत नोकरीची संधी देण्यात यावी तसेच रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर,टेक्निकल ऑफिसर,डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन नुकतेच करण्यात आले.
वरील मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.सदरील राज्यव्यापी आंदोलनात असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर विशाल राऊत,टेक्निकल ऑफिसर समाधान बोरसे,ऑपरेटर किशोर कोळी,जितेंद्र सोनवणे, संतोष पाटील,ग्राम रोजगार सेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे,राज्य संघटक कुशाल पाटील,तालुकाध्यक्ष दीपक कोळी, उपाध्यक्ष अनिल पिंजारी,सचिव सरफराज तडवी,साहेबराव कोळी,अनिल ढाके,डिगंबर पाटील,अरुण कोळी,शरीफ तडवी,गणेश भालेराव, मेहरबान तडवी यांच्यासह मनरेगा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.