यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच भोंगळ कारभारामुळे अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाचा फज्जा उडालेला आहे.यात ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायत यांच्यामार्फत बोगस ठराव करून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आलेला आहे.सदरील अनागोंदी कारभाराची तात्काळ चौकशी व्हावी या मागणीसाठी पंचायत समिती समोर सुरू असलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी लिखित आश्वसन दिल्यानंतर सोडण्यात आले.
यावल पंचायत समिती अंतर्गत शासकीय योजनाच्या माध्यमातुन चालणाऱ्या भोंगळ व भ्रष्ठ कारभाराची त्वरीत चौकशी व्हावी याकरीता ३० जानेवारी २३ पासून यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.यात यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगर कठोरा,पाडळसा,सावखेडा सिम,थोरगव्हाण,वड्री,निमगाव,गिरडगाव,कासारखेडा,चिंचोली,आडगाव,म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये शासकीय माहीतीनुसार ही गावे हगणदारी मुक्त झालेले असतांना तसेच या गावांना सरकारकडून पुरस्कार जाहीर झालेले आहेत.असे असतांना देखील शौचालय बांधकाम करणारे संबंधित ठेकेदार सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून तसेच पैशांची घेवाण घेवाण करून ग्रामपंचायत मधून बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी खोटे ठराव करून ग्रामसभेत न चर्चा करता हे ठराव मंजूर करीत आहेत.तसेच पंधराव्या वित्त आयोगातून गावाच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेचे कोणतेही नियोजन न करता सरपंच व ग्रामसेवक हि मंडळी शासनाची दिशाभूल करीत आहेत व शासन निधीवर डल्ला मारला जात आहे.स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ठराव न करता ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विचारात न घेता शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप निळे निशान सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांच्याकडून करण्यात आला होता.
सदरच्या करण्यात येत असलेल्या नियमाबाह्य कामे जिल्हा पातळीवरून तात्काळ बंद करण्याचे आदेश देवुन संबधीतांवर कार्यवाही करण्यात यावी,तालुका स्तरावरील झालेल्या कामाची बिल थांबविण्यात यावी,शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही याची काळजी पंचायत समिती प्रशासनाने घ्यावी व संबंधीतांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास आपण सत्र न्यायालय यासंदर्भात अर्ज दाखल करून दाद मागणार असल्याचे अशोक तायडे यांनी तिन दिवस चाललेल्या आमरण उपोषणाच्या सांगता प्रसंगी बोलतांना सांगितले आहे.प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी येत्या दहा दिवसात आपण संबधीत प्रकरणाची चौकशी करून जे कोणी यात दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे लिखित आश्रासन दिल्याने काल दि.१ जानेवारी रोजी सदरील आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.तर येत्या दहा दिवसात संबंधीतांवर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही न झाल्यास यावल पंचायत समिती समोर तिव स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा निळे निशान सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर व जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावेळी पंचायत समिती प्रशासनाला दिला आहे.