कोल्हापूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या वडणगे येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने त्याला त्याचा जीव गमवावा लागला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.सदरील गोड व गोंडस अशा चिमुकल्याचे नाव कृष्णराज राजाराम यमगर वय ९ महिने रा.जुना वाशीनाका असे आहे.दुर्घटना घडताच चिमुकल्याला त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले मात्र नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,कोल्हापुर जिल्ह्यातील जुना वाशीनाका येथे राहात असलेल्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या.दरम्यान संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता.त्यावेळी चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला व तो त्यात पडला.भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात व नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले.दरम्यान आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले व नाका तोंडात पीट गेल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच नाकात आणि तोंडात पिठ चिकटल्यामुळे चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला तर परिसरात याबाबतची माहिती करतात सर्वांमधून हळहळ व्यक्त होऊ लागली. दरम्यान, आता या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.