Just another WordPress site

बबन कांबळे:हार न मानणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड

पोलीस नायक

गंगाधर वाघ

हार न मानणारा हाडामासाचा पत्रकार : बबनरावजी कांबळे

वृत्तपत्र चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असते.हे काम स्वातंत्र्यपूर्व काळात जितके कठिण होते तितकेच आजच्या काळातही आहे. त्यासाठी वाचकांचा आश्रय आणि जाहिरातींचा रतीब लागतो पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र अस्पृश्य समाज निरक्षर असल्याच्या काळात आणि वाचकांचा दुष्काळ असताना ‘ मूकनायक’, ‘जनता’, ‘समता’, ‘प्रबुद्ध भारत’ अशी नियतकालिके स्वतः आर्थिक झळ सोसत नेटाने चालवली होती.कारण’हाती वृत्तपत्र नसलेल्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्ष्यासारखी असते’असे बाबासाहेब म्हणायचे.त्यांच्या काळातला गरीब अस्पृश्य समाज धम्मक्रांतीनंतर सुशिक्षित होऊन प्रगत झाला.बाबासाहेबांच्या अपेक्षेनुसार त्या समाजातील लोक’मोक्याच्या जागांवर विराजमान झाले.त्यात सत्तापदावरील नेते,आयएएस,आयपीएस अधिकारी,न्यायमूर्ती,शिक्षणसंस्था चालक,मंत्री हे सारे आले.पण समाज आणि चळवळीसाठी एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे कुणालाही वाटले नाही इथे प्रश्न आर्थिक क्षमतेचा नव्हताच.प्रश्न होता इच्छाशक्तीच्या अभावाचा!

पण विसावे शतक संपल्यानंतर म्हणजे साल २००१ ते २००५-०६(धम्मक्रांतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात) आंबेडकरी समाजात एकापाठोपाठ एक अशी अनेक वृत्तपत्रे निघाली.त्यात’महानायक’,( औरंगाबाद),’महानायक'(मुंबई),’सम्राट'( ठाणे- मुंबई),’लोकनायक’ (ठाणे), ‘धम्म शासन’ (ठाणे),’शासन सम्राट’,बहुजन महाराष्ट्र ( पुणे) यांचा समावेश होता.त्यातील केवळ ‘सम्राट’ तग धरून राहू शकला तो केवळ बबन कांबळे हे स्वतः पत्रकार असल्यामुळे.पूर्वी ते दैनिक’नवाकाळ’मध्ये असल्यामुळे मराठी साखळी वृत्तपत्रांचे साम्राज्य उभे करणाऱ्या वितरक बाबा शिंगोटे यांच्याशी कांबळे यांचे सख्य होते त्यामुळे ‘सम्राट’ विनाखंड छपाई आणि सर्वदूर वितरण करण्यात बबन कांबळे हे सफल ठरले होते.पण त्यांची प्रतिस्पर्धी असलेली बाकीची दलित वृत्तपत्रे दशकभरात अस्तंगतही झाली.

बबन कांबळे हे स्वतः भांडवलदार वा उद्योगपती नव्हते.आंबेडकरी समाजाचा लोकाश्रय हेच ‘सम्राट’चे टॉनिक होते.त्या दैनिकाच्या उभारणीत समाजातील सर्व थरांतील लोकांची साथ त्यांना लाभली.मात्र त्यांचे एकेकाळी आधारस्तंभ बनलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी संपादकीय सल्लागारांच्या भूमिकेत येऊन कांबळे यांच्यावर कुरघोडी आणि कामकाजात हस्तक्षेप सुरू केला.त्यातून ‘सम्राट’ मध्ये दोन बंडे झाली.पहिले क्लास वन अधिकाऱ्यांचे नि दुसरे क्लास तू अधिकाऱ्यांचे!पण ती बंडे पचवत बबन कांबळे यांनी ‘सम्राट’चे प्रकाशन अखंड राखले होते. जलदान विधी,वाढ दिवस आणि वधू-वर मंडळे-मेळावे या पलीकडे ‘सम्राट’ला जाहिराती नव्हत्या.उत्पादने,उद्योगधंदे यांच्या जाहिरातींच्या बाबतीत हे वृत्तपत्र तसे ‘बहिष्कृत’च ठरवले गेले होते.अशा आर्थिक कोंडीत बबन कांबळे यांनी आधी ठाणे,नंतर दादर,टिळक नगर येथील भदंत डॉ.राहुल बोधी यांचे बुद्ध विहार,भांडुप अशी स्थलांतरे करत ‘सम्राट’ चा गाडा ओढला,पुढे रेटला पण आजारपणामुळे त्यांचा तो प्रवास आज सकाळी अकालीच थांबला,संपला.

गेली दोन वर्षे कोरोनाची महामारी आणि लॉक डावूनमध्ये गेली.उद्योग जगताला मोठा फटका बसला.वृत्तपत्रांची वितरण व्यवस्थाच बंद पडली होती.त्या तडाख्यामुळे काही वृत्तपत्रांना आवृत्या बंद कराव्या लागल्या.कुठे कर्मचारी कपात करण्यात आल्याने पत्रकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.त्या बेकारीने काही पत्रकारांचे बळी घेतले.अशा या कठीण काळातही बबन कांबळे यांनी हार मानली नव्हती.’सम्राट’चे प्रकाशन थांबू दिले नव्हते हे विशेष !

दैनिक “सम्राट” वृत्तपत्राचे संपादक मा.बबनरावजी कांबळे हे आज पहाटेच्या समयी बौद्धवाशी झाले.संपादक बबन कांबळे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखदायक आहे.त्यांना पोलीस नायक वृत्तपत्राच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.

मुख्य संपादक,बाळासाहेब आढाळे

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.