मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती.त्याबाबत तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती.त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाली असल्याची बातमी समोर आली आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल व उपराज्यपाल यांची बदली केली असून त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
काही दिवसानंतर महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल यांचे अभिभाषण होत असते त्यामुळे विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विरोध होण्याची दाट शक्यता होती.दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपाल यांच्याविरोधात आंदोलन केले होते तसेच मविआ नेत्यांच्या वतीने सतत राज्यपाल हटावची मोहीम राबवली जात होती.मात्र अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले होते.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यापासून त्यांनी कायम विरोधी भूमिका घेतली होती त्यामुळे राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद कायमच रंगलेला महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाला यात महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी कोश्यारी यांनी सोडली नाही.यात वाद एवढा टोकाला गेला होता की मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्याने सुमारे पाऊण तास थांबून राज्यपालांना सरकारी विमानातून खाली उरतावे लागले होते.सत्ताबदल झाल्यापासून कोश्यारी शांत होते परंतु मध्यंतरी काही वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत आले होते.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही फार मोठी कोंडी होत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा संपन्न झाला.या दौऱ्यानंतर राज्यपाल भवनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते की,“महाराष्ट्रासारख्या संत,समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक,राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते.गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम व आपुलकी कधीही विसरता येणार नाही.माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन,मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,”असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले होते.त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती समोर येत आहे.