कराड तालुक्यातील मुंढे येथे सख्या चिमुकल्या लहान बहिण,भावाचा उलट्या व खोकल्याच्या त्रासानंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली.सदरील घटना हि धान्याची साठवणूक करतांना त्याला कीड लागू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने हृदय हेलावून सोडणारी दुर्दैवी घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.श्लोक अरविंद माळी वय ३ वर्षे व तनिष्का अरविंद माळी वय ७ वर्षे दोघेही रा.मुंढे,ता.कराड अशी मृत्यू पावलेल्या दोन्ही बहीण भावंडाची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,कराड तालुक्यातील मुंढे येथील अरविंद माळी यांचा मुलगा श्लोक याला अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतांनाच दि.१३ रोजी श्लोकचा मृत्यू झाला.तर दि.१४ मंगळवार रोजी तनिष्काला उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिलाही रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तिचाही उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.यावेळी तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यात अंतर्गत अतिरक्त स्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच तनिष्काचे शवविच्छेदन दि.१४ मंगळवार रोजी सायंकाळी करण्यात आले मात्र हा अहवाल अद्याप उपलब्ध झाला नसल्याने तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकलेले नाही.सदरील घटनेने मुंढे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यानअरविंद माळी यांनी घरात धान्य साठवणुक करतांना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता त्या पावडरच्या घरातील उग्र वासामुळे या लहान बालकांचा मृत्यू झाला असावा असा कयास अरविंद माळी यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनाकडे व्यक्त केला आहे.अधिक तपास फौजदार प्रवीण जाधव करीत आहेत.