औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यात कन्नड तालुक्यात मौजे नादरपूर येथील एक व मौजे एकोड तांडा येथील एक अशा दोन जणांवर वीज पडल्याने मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.गेल्या काही दिवसापासून शहर व जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम असून कुठे जोरदार तर कुठे हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.शनिवारीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.दरम्यान कन्नड तालुक्यातील मौजे नादरपूर येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमाराला डोंगर कडेच्या भागात वीज पडून नामदेव शेनफडू निकम(वय ३४)यांचा मृत्यू झाला.यात प्रकाश तेजराव निकम(वय ३०),दीपक विष्णु निकम (वय २२)हे दोघे जखमी झाले असून जखमींना पिशोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सूत्रांनी कळविले आहे.त्याचबरोबर मौजे एकोड तांडा क्रमांक तीन येथे दुपारी अडीच्या वाजेच्या सुमारास वीज पडून आनंद बद्रीनाथ चव्हाण (वय १६)या युवकाचा मृत्यू झाला.तसेच वैजापूर तालुक्यातील दसकुली या गावात वीज कोसळून एक गाय दगावली आहे.