संतोष भालेराव,अमरावती
पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अचलपूर येथील उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कार्यालयाशी संबंधित कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना जाणूनबुजून वेठीस धरून येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा अनुभव गौरखेडा कुंभी ता.अचलपूर येथील एका सामान्य नागरिकाने आमच्या प्रतिनिधीकडे बोलतांना व्यक्त केला आहे.त्याचबरोबर येथील कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबवून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणीही नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गौरखेडा कुंभी गावात भुमी अभिलेख अचलपूर यांच्यामार्फत ड्रोन सर्वे करून जुण्या गावठाणातील मालमत्तेचे सर्वेक्षण करून नोंदी घेण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला होता.त्यानंतर काही दिवसानी ज्या मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात आले त्यांना भुमी अभिलेख अचलपूर कार्यालयामार्फत गावातील नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या परंतु एका नागरिकाचा भुमी अभिलेख कार्यालयाशी तिळमात्र संबंध नसतांना त्याला सूद्धा त्याच कार्यालया मार्फत चुकीची नोटीस पाठवण्यात आली.सदरील नोटिसीमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख नसुन त्याच्या आईच्या नावाचा उल्लेख होता तसेच तो राहत असलेल्या त्याच्या नावावर ग्रामपंचायत ८/अ उता-यावर मालमत्तेचे क्षेत्रफळ १४९९ स्केअर फुट नोंद असल्यानंतर ही ४३९.९२ स्केअर फुटच असल्याची नोंद अचलपूर भुमी अभिलेख उपअधिक्षक यांच्या आदेशानुसार त्यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नोटीसवर दाखविण्यात आलेले आहे.याबाबत अर्जदाराने शहानिशा करण्याकरिता केलेल्या पाठपुराव्यानंतर देखील अचलपूर भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही.अर्जदाराने वारंवार अर्ज दाखल केल्यानंतर अखेर सदरील नोटीस हि संगणक ऑपरेटरच्या अनावधानाने,चुकिने तयार झाली असून हि नोटीस रद्द समजण्यात यावी अशा आशयाचे पत्र उपअधीक्षक भुमी अभिलेख श्री के.एस.सानप यांच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.परिणामी सदरील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्याचबरोबर येथील जनमाहिती अधिकाऱ्यांकडून देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून न्याय मागण्यासाठी चुकीचे काम करणा-या कर्मचा-याची तक्रार करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांना धमक्या द्यायचे काम भुमी अभिलेख अचलपूर कार्यालयामार्फत चालू आहे अशी आपबिती तक्रारकर्ता सामान्य नागरिकाने व्यक्त केली आहे.तरी याकडे संबंधितांनी लक्ष पुरवून अचलपूर भुमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.