यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल भुसावळ रस्त्यावर काल दि.२७ रोजी रात्रीच्या सुमारास अजय मोरे हे भुसावळकडून आपल्या शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावलकडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचेकडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले होते.यात पोलीसांनी योग्य दिशेने तपासचक्रे फिरवीत यातील दोन संशयीत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.सदरील कामगिरीबद्दल यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल भुसावळ रस्त्यावरील अंजली घाटात सदरची घटना दि.२७ रोजी रात्री पावणे दहावाजेच्या सुमारास घडली असल्याचे वृत्त येथील पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले व सदरील पोलीस पथकांने आरोपींच्या शोध कार्यासाठी वेगाने तत्परता दाखवुन काही तासातच या रस्तालुटीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणुन करण रमेश पवार व विक्की अंकुश साळवे दोघे राहणार आसोदा तालुका जिल्हा जळगाव यांना यावल शिवारातुन शिताफीने अटक करण्यात यश मिळविले आहे. तर दोन आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून पोलीस पुढील दिशेने यॊग्य तपास करीत आहे.पुढील दोन्ही आरोपींना देखील शोधण्यात लवकरच यश येईल असा विश्वास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी व्यक्त केला आहे.सदरील घटनेतील चोरटे हे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते.
तर यावल भुसावळ हा मार्ग वाहतुकीचा असुन रात्रीच्या वेळेस देखील मोठया प्रमाणावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरीकांची नेहमीच वर्दळ या मार्गावर असते.यामार्गावरील अंजाळे घाटात मागील अनेक वर्षापासुन या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आली आहे मात्र नागरीकांच्या रक्षणासाठी या चौकीवर पोलीस राहात नसल्याने अशा प्रकारच्या रस्तालुटीच्या घटना घडत असतात.तरी पोलीस प्रशासनाने याठिकाणी पोलीस चौकीवर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच या रस्त्यावर रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.