कापुस खरेदीच्या मापात झोल करणाऱ्या व्यापाऱ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोठावला अकरा हजार रुपयांचा दंड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्री येथे कापूस खरेदी करतांना व्यापाऱ्याने मापात पाप करून मोठाच झोल केलेला होता व सदरील बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली होती.याबाबत संबंधित कापूस खरेदीच्या मोजणीत मापात झोल करणाऱ्या त्या व्यापाऱ्यावर प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा संजय गायकवाड यांनी अकरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.सदरील कारवाईमुळे मापात झोल करणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा,संजय गायकवाड हे सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथील प्रशासकाची जबाबदारी सांभाळत आहेत.त्यांनी या घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेऊन त्याला ११ हजार रुपये दंडाचे आकारणी केली आहे.या आकारणीमुळे शेतकऱ्यांची मापात घोड करून फसवणुक व लुट करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.यापुढे अशा प्रकारे जर काही व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना संशय आल्यास तात्काळ यावलच्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याशी संपर्क साधावा व रीतसर तक्रार करावी असे आवाहन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वप्नीन सोनवणे यांनी केले आहे.