बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.६ मार्च रोजी होळी व ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी श्री.खंडेराव महाराजांचा यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यानिमित्त यात्रामहोत्सवाचे पावित्र्य व महिमा पुढीलप्रमाणे आहे.
यात्रेचा प्रारंभ व आख्यायिका
श्री खंडेराव महाराज्यांच्या यात्रोत्सवाची सुरुवात साधारण १९० वर्षांपूर्वी अगाध विद्यापंडित व विद्याविशारद प्रसिद्ध वैद्यराज श्री.सोमबुवा झोपे यांनी केली.यात यात्रोत्सवाच्या आख्यायिकेनुसार वैद्यराज सोमबुवा झोपे यांनी त्यांच्याकडील अगाध विद्येच्या आधारावर डोंगर कठोरा येथील हनुमान मंदिराजवळ एक लिंबू भारून ते लिंबू चालत जाऊन ज्या ठिकाणी ते लिंबू थांबेल त्या ठिकाणी श्री.खंडेराव महाराजांचे मंदिर बांधण्यात यावे व तेथपर्यंत बारागाड्या ओढण्यात याव्या असे ठरविण्यात आले.त्यानुसार तब्बल १९० वर्षांपासून आजतागायत दरवर्षी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठया आनंदाने साजरा केला जात आहे.हे विशेष!
होळी
होळीच्या दिवशी गावठाण पटांगणावर एकाच ठिकाणी सार्वजनिक होळी पेटविली जाते.होळीकरिता लागणारी पूजा,पाच नारळांचे तोरण व नैवद्य हा येथील सोमबुवा झोपे यांचे वंशज प्रकाश उखाजी झोपे यांच्याकडून देण्यात येते.त्यानुसार होळीच्या दिवशी प्रकाश झोपे यांच्या घरून होळी पूजनाचे साहित्य त्यांच्या घरून वाजत गाजत होळीच्या ठिकाणापर्यंत आणले जाते.होळीदहनाठीकाणी ब्राह्मणांचे मंत्रोचाराने होळीची पूजा करून संध्याकाळी साधारण ५ वाजेच्या पुढे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व गावातील सर्व जाई धर्माचे लोक यांच्या समक्ष व सहभागातून होळी पेटविली जाते.यावेळी गावातील बहुतेक स्रिया होळीला पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करून मनोभावे पूजा करून प्रदक्षिणा घालून इच्छित मनोकामनेचे साकडे होळीला टाकत असतात.
नवरत बसविणे (बारागाड्या ओढण्याची शक्ती)
होळीच्या दिवशी रात्री ८ वाजेच्या पुढे वैद्य श्री.विजय चिंधू झोपे यांच्या घरी नवरत बसविले जाते.यावेळी भगत नरेंद्र लक्ष्मण झांबरे हे बारागाड्या ओढणारे भगत असल्याने त्यांना अभ्रंग दिला जातो.व त्यानंतर भगताला बिरकंगनाच्या विद्येच्या आधारे बारागाड्या ओढण्याकरिताची शक्ती प्रदान केली जाते.यावेळी भगताला अभ्रंग दिल्यानंतर भगताला येणारी ताकद हि फार वाखाणण्याजोगी असते.जेणेकरून वैद्यशक्ती आजही जिवंत असल्याचे स्पष्ट होते.नवरत बसवितेवेळी गावातील सर्व वैद्य लोकांना वाजतगाजत बोलाविले जाते व पूजा अर्चा करून नवरत बसविले जाते.
बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम
धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी श्री.हनुमान मंदिरापासून तर श्री.खंडेराव महाराज मंदिरापर्यंत पाणी शिंपडले जाते.नंतर विधिवत गावातून तेरा गाड्या जमा केल्या जातात.त्यानंतर त्यांना एकमेकांना साखळदंडांनी बांधून दुपारी त्यांना हळदी व शेंदुराची शापे मारले जातात.नंतर साधारण चार वाजेच्या पुढे नवरत उठविले जाते.नवरतापुढे ३०-४० फूट उंचीची फराळ व पतके लावलेली भलीमोठी देवकाठी असते.प्रसंगी नवरत बसलेल्या भगताला सर्व देवी देवतांच्या पाय पडून आणल्यावर बारगाड्यांना एक चक्कर मारून हुक(बद्दी)लावली जाते व हुक लावल्याबरोबर श्री.हनुमान मंदिरापासून तर श्री खंडेराव महाराज मंदिरापर्यंत किमान एक किलोमीटर अंतरापर्यंत लोकांनी भरगच्च भरलेल्या बारागाड्या ओढल्या जातात.यात श्री.सोमबुवा झोपे यांची विद्या आजही जिवंत असल्याची पावती मिळते.
याकामी गावातील वैद्यलोक प्रभाकर उखाजी झोपे,प्रकाश उखाजी झोपे,विजय चिंधू झोपे,सुनील मुरलीधर झांबरे,कांतीलाल लालचंद झोपे,पंकज प्रकाश झोपे,दिनेश राजेंद्र झोपे,प्रमोद पाटील,नेमिनाथ झांबरे,नितीन भिरूड,भगवान लोहार,अरविंद पाटील,शंकर वारके,गणेश राणे,संजय सरोदे,नितीन पाटील,चंद्रकांत भिरूड,राहुल आढाळे,अमोल पाटील,पोपट पाटील,विलास झांबरे,चेतन पाटील,मयूर जावळे,ललित शिंपी,युवराज पाटील,रवींद्र बऱ्हाटे,हेमराज सरोदे,पंकज झांबरे,जयंत महेश्री,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,ग्रा.पं सदस्य डॉ.राजेंद्र कुमार झांबरे,मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,कल्पना पाटील,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,रबील तडवी,वसीम तडवी यांच्यासह श्री.खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट तसेच सर्व जातीधर्मातील तरुण वर्ग या यात्रोत्सवात परिश्रम घेतात.सदरील यात्रेतील जिवंतपणा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह इतर विविध राज्यांतून भाविक भक्त यात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात.