यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथील शिवारातील राजेंद्र चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किमतीचे केळीची खोडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अज्ञात माथेफिरूविरुद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या केळी पिकांसह अन्य पिकांची नासधुस करण्याच्या घटना घडत होत्या याकडे शेतकरीवर्गाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.मात्र आता या माथेफिरूंनी कळस गाठला असून तालुक्यातील शेतकऱ्यांची झोप उडविणारा प्रकार नुकताच घडला आहे.यात यावल तालुक्यातील अट्रावल येथील यावल शिवारात शेत असलेल्या राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या मालकीच्या पावल शिवारातील गट क्रमांक ९०७ मध्ये १ हेक्टर ८६ आर या क्षेत्रामध्ये केळीची लागवड करण्यात आलेली आहे.दि.४ रोजी नेहमीप्रमाणे राजेन्द्र चौधरी हे शेतात गेले असता त्यांना काही भागातील केळी पिकाचे नुकसान केले असल्याचे लक्षात आले.मात्र दि.५ रोजी पुन्हा त्यांचा मुलगा भुषण चौधरी हा शेतात गेला असता त्याला देखील शेतातील केळीची खोड मोठया प्रमाणावर कापुन फेकल्याचे दिसुन आले.सदरील बाब भूषण चौधरी यांनी त्यांचे वडील राजेन्द्र चौधरी यांना सांगितली त्यानुसार सदर शेतातुन अज्ञात माथेफिरूने सुमारे २५ लाख रुपये किमतीचे ७००० केळीच्या खोड व घड कापुन फेकल्याचे दिसून आले.याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी राहणार अट्रावल तालुका यावल यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून त्या अज्ञात माथेफिरूंच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रसंगी फैजपुर विभाग पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे व पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील चौकशीच्या आपल्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहेत.