यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीकरिता राज्य सरकार व राज्यातील कर्मचारी बांधव यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने राज्यातील सर्व कर्मचारी यांनी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तालुक्यातील बहुतेक सर्व राज्य कर्मचारी यांच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.याबाबत विविध राज्य कर्मचारी संघटनांच्या वतीने आज दि.१४ रोजी तहसीलदार महेश पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यभरात सर्व राज्य कर्मचारी यांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्याबाबत तालुक्यातील शिक्षक,महसुल,ग्रामसेवक,पंचायत समिती,नगर परिषद अशा विविध कार्यालयातील कर्मचारी यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे.आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक व इतर राज्य कर्मचारी यांच्या वतीने आज दि.१४ रोजी पंचायत समिती आवारातुन राज्य शासनाच्या निर्णयाविरूद्ध घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदार महेश पवार यांना आपल्या जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भातील मागण्याचे निवेदन देण्यात आले.प्रसंगी आपल्या मागणीसाठी तालुक्यातील राज्य कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.परीणामी मागण्या मान्य होईपर्यंत संपाची माघार होणार नसल्याचा निर्धार राज्य कर्मचारी संघटनांनी केला आहे.या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा परिणाम पंचायत समिती,शाळा,महाविद्यालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केन्द्र,नगर परिषद,आदीवासी एकात्मीक कार्यालया अंतर्गतच्या आदीवासी आश्रम शाळा तसेच अनेक सरकारी विभागाच्या कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आला.